🔥 Trending News

Back to Trending
NEWS

चंद्रपूरात वन्यप्राण्यांचा हल्ला: दोन जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

📅 02 Mar 2026

👁 41 people read this

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती वनविभागाने दिली.


पहिली घटना मोहर्ली वनपरिक्षेत्रात घडली. पद्मापूर येथील रहिवासी काशीनाथ शिवराम लोनवले (वय ६०) हे सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जळण लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते. तेथे अज्ञात वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वनविभागाने तात्काळ पंचनामा करून मृताच्या कुटुंबियांना तातडीची ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत.


दुसरी घटना मुल तालुक्यातील आदर्शखेडा गावाजवळ घडली. सुनिता शामराव भोयर (वय ४३) या सुमारे ५० ते ६० महिलांसोबत कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात एकटे न जाण्याचे, सकाळ‑सायंकाळ सावध राहण्याचे आणि समूहानेच शेतीकामासाठी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित भागात गस्त वाढवून वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

← Back to Trending