13 वर्षांच्या तिलक मेहताने उभारला 100 कोटींचा व्यवसाय
औरंगाबादचा तिलक मेहता केवळ 13 व्या वर्षी सुरू केलेल्या ‘Papers n Parcels’ या कुरिअर स्टार्टअपने देशभरात ओळख मिळवली. कमी किमतीत त्याच दिवशी डिलिव्हरी देण्याच्या कल्पनेमुळे तो आज तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
एकदा सुट्टी संपवून घरी आल्यानंतर तिलकला लक्षात आले की त्याचे गणिताचे पुस्तक मामाच्या घरी राहिले आहे. दुसऱ्या दिवशी शाळा होती आणि पुस्तक खूप आवश्यक होते. वडील थकलेले असल्याने ते पुन्हा एवढ्या लांब जाऊ शकत नव्हते. तिलकने कुरिअर शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुरिअरची फी पुस्तकाच्या किमतीपेक्षा जास्त होती. तेव्हाच त्याच्या मनात प्रश्न आला — “एखादी स्वस्त आणि जलद डिलिव्हरी सेवा का नसावी ?” याच प्रश्नातून ‘Papers n Parcels (PNP)’ या स्टार्टअपचा जन्म झाला.
2018 मध्ये केवळ 13 वर्षांचा असताना तिलकने आपल्या मामा घनश्याम पारेख यांच्यासोबत कंपनीची सुरुवात केली. मामा कंपनीचे CEO झाले आणि त्यांनी संपूर्ण ऑपरेशन्स सांभाळले. या सेवेमध्ये विशेष म्हणजे पारंपरिक कर्मचारी ठेवण्याऐवजी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाला नेटवर्कसोबत करार केला. प्रत्येक यशस्वी डिलिव्हरीवर कमिशन देण्याची पद्धत ठेवली गेली. मोबाइल Application ऑर्डरची सूचना मिळताच डबेवाले पार्सल पोहोचवत. या मॉडेलमुळे कंपनीला पगाराचा खर्च किंवा लॉकडाऊनसारख्या काळात मोठे नुकसान सहन करावे लागले नाही.
लोकांना कमी दरात त्याच दिवशी पार्सल मिळू लागले आणि सेवा झपाट्याने लोकप्रिय झाली. काहीच वर्षांत कंपनीची उलाढाल 100 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचल्याची माहिती समोर आली. तिलकच्या वयामुळे त्याला प्रचंड मीडिया कव्हरेज मिळाले आणि तो TEDx मंचावरही बोलण्यासाठी आमंत्रित झाला.
आज तिलक गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच उद्योजकतेचा प्रवास सुरू ठेवत आहे. त्याचे वडील विशाल मेहता व्यवसाय करतात तर आई काजल मेहता गृहिणी आहेत. लहान बहिण तन्वीही त्याच्याकडे अभिमानाने पाहते.
तिलक मेहताची कहाणी एक महत्त्वाचा धडा देते — मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी वय, पैसा किंवा मोठी पार्श्वभूमी आवश्यक नसते. समस्या ओळखण्याची नजर आणि ती सोडवण्याची तयारी असेल, तर साध्या कल्पनेतूनही मोठं यश उभं राहू शकतं.